मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीची विचार करायला लावणारी प्रतिक्रिया असिफा बलात्कार प्रकरणावर दिली आहे आवश्य एकदा सविस्तर वाचा त्यांची प्रतिक्रिया आपणही विचार कराल !

मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीची विचार करायला लावणारी प्रतिक्रिया असिफा बलात्कार प्रकरणावर

काय आहे हे प्रकरण:- जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील घटना. १० जानेवारी रोजी कठुआ बकरवाल समुदायाची एक आठ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. पोलीस तक्रारीत म्हटलेय, आरोपीने घोडे शोधण्यासाठी मदत करण्याच्या बहाणाच्या मुलीचे अपहरण केले. या मुलीला देवळात बांधून ठेवण्यात आले. तिला बेशुद्ध करण्यासाठी औषध पाजण्यात आले. १७ जानेवारीला एका झुडपात तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. मुलीचे अपहरण करुन तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी सांजी रामसह ८ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. चार्जशीट दाखल केल्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्याचा आरोपी संजीराम, त्याचा मुलगा विशाल आणि भाच्याला अटक केलीय.

या प्रकरणाच्या चौकशी निगडीत विशेष पोलीस अधिकारी दीपक खजूरिया, सुरिंदर कुमार, प्रवेश कुमार, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल तिलक राज यांना पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. यावर देशभरातून प्रतिक्रया उमटत आहेत. सोशल मीडियावर प्रतिक्रिया वाढू लागल्या आहेत. यातच मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने अशी दिली प्रतिक्रिया….

काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर?
मला जे काही वाटतंय त्याने तसाही कसला बदल घडणार आहे? कुठली क्रांती येणार आहे ? आठ वर्षांचं ते ‘असिफा’ नावाचं लेकरू तडफडून मेलं. माझ्यापासून कित्येक किलोमीटर दूर काश्मीर नावाच्या देशात. हो देशच! पण मेली ती पोर. हाल-हाल होऊन मेली. मेल्यानंतर पण तिच्या चिंधड्या चिंधड्या करत राहिलो आपण सगळे… #JusticeForAsifa असे हॅशटॅग्स येत राहिले फक्तं. बाकी सगळं चालूच राहिलं तसंच. माझं शेड्युल, मिटींग्स, शुटिंग्स, डिनर्स, इन्स्टा स्टोरीज, नॅशनल अवॉर्ड्स… सगळं.. रोजचंच.. रोजच्यासारखंच.

पण या सगळ्यामध्ये ही बातमी ज्याक्षणी वाचली तेव्हापासून जो काय भीतीचा गोळा आलाय पोटात, तो जाता जात नाहीये. बलात्कार, वासनाकांड, लिंगपिपासा ही कधीही घृणास्पदच. त्याचं कुठलाही समर्थन असूच शकत नाही. कधीच! पण त्याला जो आणि ज्यापद्धतीचा सपोर्ट मिळतो आहे, ते ज्या पद्धतीने पाठीशी घातलं जातंय, तिरंग्याची देशप्रेमाच्या नावाखाली जी काय अंतयात्रा काढली जातीये, किंवा एकुणातच ही जी काही हिडीस दमनशाही चाललीये त्यात कसं ‘असायचं’ आहे आपण? मुजोरपणाची किती टोकाची परिसीमा? आणि हा कसला बेशरम नंगानाच चाललंय आसपास??

मी खूप ठरवलं की यावर आपण बोलायचं नाही. व्यक्त व्हायचं नाही. काय फरक पडतो इतके सगळे लोक बोलत असताना मी नाही बोलले तर? आणि त्यातून सोशल मीडियावर तर नकोच. उगाच कशाला नसते वाद अंगावर घ्या! खूप प्रयत्न केला शांत बसायचा. पण खरं सांगू, ते फोटोमधले हसरे मोठे मोठे डोळे ना झोपूच देत नाहीयेत. विचित्र पाठलाग करतायत असं वाटतं सारखं.

काल एक ट्विट वाचलं, “अच्छा हुआ असिफा मर गई, बडी होती तो वैसे भी आतंकवादी हि बनती.” मी शप्पथ सांगते मला रडू आलं एकदम. यापेक्षा जास्त काय करू शकणार म्हणा. रडूच शकतो फक्त. पण हे रडू घाणीचं होतं. रागाचं, तिरस्काराचं, हताश वाटण्याचं, भीतीचं, सगळ्याचं. ही कुठली विषारी गोळी गिळलीये आपण समाज म्हणून ? सगळ्यांनी, एकत्र? असिफाला गोळी देऊन गुंगीत असताना बलात्कार केला तिच्यावर. आपलंही फार काही वेगळं नाहीये. ही गुंगीची गोळी देऊन अक्ख्या समाजावर वर्षानुवर्षं बलात्कार झालाय आणि ते मेंदू दगड घालून फोडलेत कोणीतरी! कुठलाही विषय आपण बेसिक संवेदनशीलतेने पाहू शकतच नाही! फक्त ओंगळवाणी, बीभत्स, किळसवाणी प्रदर्शनं मांडू शकतो. आपल्या भक्तीची, श्रद्धांची; देवाची. नुसती प्रदर्शनं.. नुसत्या आराशी!

साधं खरचटलं तरी दोन दिवस जोंबाळतो आपण स्वतःचा जीव. त्या एवढ्याश्या पोरीला काय झालं असेल? किती किती दुखलं असेल. शरीराच्या त्या भागाशी ‘शू’ करण्याव्यतिरिक्त ओळखही न होण्याचं वय ते…आपल्यासोबत हे काय होतंय कळायच्या आतच संपली ती. आणि संपली नाही सीधेपणानी.. गळा दाबून, दगडाने डोकं ठेचून संपवली तिला….

मला खरंच खूप भीती वाटतीये. की मी या अशा जगात राहतेय जिथे हे सगळं खूप नॉर्मल वाटतंय सगळ्यांना. किंवा माझ्या आसपासचे सगळेच पोटात ही भीती घेऊन वर नॉर्मलसीचा मुखवटा घालून जगतायत. हे तर फारच भीतीदायक आहे. आपल्याला सगळ्यांना या सप्रेशनने वेड लागेल कदाचित. किंवा लागलंही आहे ऑलरेडी! ‘आपले – त्यांचे’, ‘माझ्या जातीचे – त्याच्या जातीचे’ या सगळ्यात माझ्या बाई असण्याची आणि माणूस असण्याची जी ‘लक्तरं’ निघतायत; त्याने मी उभी आडवी नासवली जातीये. दररोज.

मला झोप नाही लागतेय नीट रात्रीची. या अशा वातावरणाची, त्याच्याशी जुळवून घेण्याची आणि काही पर्याय नाही, म्हणून पाय ओढत जगत राहण्याची मला खरंच खूप, खूप जास्त भीती वाटतीये!

– स्पृहा जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta